Saturday, December 26, 2009

नाव अन परी

एका अथांग सागरात नाव एक छोटीशी।
नाव नेईल तिकडे जाणारा मी एक खलाशी....

जन्म माझा नावेतला, तीला कधी सोडलेच नाही।

व्हलवे असुनही कधी तिला मी व्हलवलेच नाही...

नाव नेईल तिकडे गेलो, कधी काही बोललोच नाही.
कित्येक किनारे गेले बाजुने पण नांगर कधी टाकलाच नाही...

किनार्‍यावर कधी उतरायचे नाही असा समजच झालेला.
ज्या नावेत वाढलेलो तिला सोडायचे नाही हाही विचार केलेला...

वर्षानुवर्ष चालु होता असा माझा निरंतर प्रवास.
ना कधी थांबण्याची ओढ ना कधी किनार्‍याची आस...

एका सकाळी मात्र सगळे गणितच चुकले.
सांगण्याची सोय नाही होत्याचे नव्हते झाले...

दुर किनार्‍यावर एक सुंदर परी दिसली होती मला.
कधी नाही ते किनार्‍याची आस लागली होती मला...

नेहमीप्रमाणे नाव काही थांबायला तयार नव्हती.
किनार्‍यावर रेंगाळलेले मन माझे निघायला तयार नव्हते...

आयुष्यात प्रथमच नावेचा विचार बाजुला सारला.
अन किनार्‍यच्या दिशेने पाण्यात सुर मारला..

आता मात्र कळुन चुकतेय, पुरता कात्रीत सापडलोय.
एकीकडे नाव एकीकडे परी, मी मध्ये गटांगळ्या खातोय...


____निशिगंध____

Friday, October 2, 2009

माझा प्रवास

समोर भयाण काळोख
वाट्सुध्दा सरळ नाही
साथ देणारही कोणी नाही
मी एकटाच प्रवासी.....

वाट चालतच आहे
अंतराचेही भान नाही
दिशा देणारही कोणी नाही
मी एकटाच प्रवासी.....

ठेचा लागती पदोपदी
रक्त माझे थांबतच नाही
दु़ख: वाटण्यासही कोणी नाही
मी एकटाच प्रवासी.....

दुर एक मिणमिणता दिवा
जणु ध्येय माझेच वाटत राही
स्वागतालाही तिथे कोणी नाही
मी एकटाच प्रवासी.....

ध्येयामागुन ध्येय
स्वप्न पुढले दिसत राही
थांबण्यास इथे उसंत नाही
मी एकटाच प्रवासी.....

प्रवास माझा निरंतर
मी एकटाच प्रवासी.....
मी एकटाच प्रवासी.....


_ निशिगंध

Tuesday, September 15, 2009

माझ्या भावनांची कविता..

परवाच कॉलेजचे शेवटचे काम ( TC\LC काढला) केले..आणी काय झाले कळलेच नाही.. दिवसभर वेगळ्याच मनस्थितीत होतो... काहीतरी हरवलेय असे वाटत होते..पण मी मात्र ते शोधायला तयार नव्हतो..ती समोरुन निघुन गेली यावेळेशी मी तिला थांबवले नाही किंवा बोललो नाही..शेवटी निघालो.. गाडीत बसलो आणी मग मात्र मन भरुन आले..

कळणार कसे सखे तुला
भाव माझ्या मनाचे.
तुझा तरी काय दोष त्यात
मी कधी बोललोच नाही....

खुपदा ठरवले होते तुला
सर्व काही सांगायचे.
वेळ निघुन गेली प्रत्येकदा
पण कधी धीरच झाला नाही....

कॉलेज नसतानाही येत होतो
मी फक्त तुझ्याचसाठी.
कित्येकदा समोरुन गेलीस तु
पण कधी थांबवूच शकलो नाही....

मन माझे वेडे होते
तुला शब्दाविना कळण्याची वाट पाहत राहीले.
त्या भावना शेवटी माझ्याकडेच
तुला त्या कधी कळल्याच नाही....

आता जात आहे कायमचा

तु परत दिसण्याचीही शक्यता नाही.
तु समोर असुन ही मी निघालो
तुझा साधा निरोपही घेतला नाही......

~निशिगंध

Friday, August 14, 2009

एका मित्रानंतर ही कवीता दुसर्‍या मित्रासाठी,

ह्याला तर वयाची २८ वर्षे पुर्ण होईपर्यंत कोणीच नाही आवडली...( असे तोच म्हणे ). एकदम हुशार असण्यार्‍या ह्या मित्राचा RESUME वाचायचा म्हणजेच अंगावर काटा येतो.सरस्वती देवीचे हे लाडके बाळ आहे. त्यामुळेच आमचा टॉपर नसेल तर नवलचं...ह्याचा एकच अवगुण म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त सार्वजनिक (थोडक्यात आमचीच) कामे करण्याची दांडगी आवड.. असो..
ह्याला एक मुलगी आवडली होती.. (डायरे़क्ट लास्ट ईयरचीच..आणी आमचे भाउसाहेब तीला बोलले पण लास्ट च्या दिवशीच)
तीच्यासाठी हा माणुस सकाळी सकाळी उठुन तिच्यासोबत ईड्ली खायला जायचा. ( तीला माहीत नव्हते ती आपली वेगळ्या टेबलवर आणी हा वेगळ्या)..
आम्हाला त्याचे हे रुप माहीतच नव्हते त्यामुळे आम्ही पण गोंधळलेलो होतो..शेवटी आमची कॉमन थियरी प्रंमाणे (ती नाही म्हटली तरी चालेल पण तीला आपल्या भावणा कळल्याच पाहीजेत) तो तीला बोलला..त्यानंतर त्यानं तीला पाहीलेले पण नाही..
माझी देवाला हीच प्रार्थना त्यांच्या प्रेमप्रवासाचा सफल होवो( ह्याने तसे प्रयत्न करावेत)


ही कवीता मी लिहिली त्याच्यासाठीच॥पण ह्यात त्याची व आमची तुलनाच आहे॥(तशी तुलनाच शक्य नाही म्हणा) पण आमचा हा केवीलवाणा प्रयत्न................

आम्हास काळोखी उदास भयाण रात्रच प्यारी,
तुम्हास ती कोवळी रेशमी किरणेच प्रिय भारी।

आम्ही सकाळची न्याहरी कधी मिळवलीच नाही,
तुम्ही मात्र साडेदहाची इडली कधी चुकवलीच नाही।

तुमच्या प्रपोजमधे बस स्टापची एक वेगळीच कथा,
आमच्या नशिबात बस स्टापच नाही ही आमची व्यथा।

तुम्ही नंतर फ़ोन करुन "धन्यवाद"ही केले,
आमचे मन मात्र नुसते विचार करुनच मेले।

तुमच्या सखी ने सगळे गुपित मनातच कोरले आहे,
आम्हाला मात्र गाज्यावाज्याच्या भीतीने घेरले आहे।

आमची खरी प्रिया कोन हे आम्हा कधी कळलेच नाही,
तुमची एकच फिक्स त्यामुळे रोजची भेट कधी टळलीच नाही।

आता मात्र ठरवलेय अगदी तुमच्या सारखच वागायचय,
मनाला आवर घालत कुणा एकीलाच निवडायचय।

जास्त काही नाही सर मला फक्त एवढेच करु द्या,
सुरवात केली तुम्ही शेवट मात्र आम्हाकडूनच होउ द्या!

~ निशिगंध

Monday, June 1, 2009

माझा एक मित्र आहे र.....
(नाव नको उगीच लफडा)

असो आम्ही सर्व जण म.टेक (M.Tech) ला एकत्र आलो. आणी आम्हाला आमच्यातील साम्य कळले. कुणालाही (काही लहान अपवाद) आतापर्यंत एकपण मैत्रीण नाही. (आता या क्षणी असेल तर मात्र मला माहीत नाही).
प्रत्येकाचा प्रेमाशी काडीचाही संबध नव्हता. पण म.टेक ला आल्यावर प्रत्येकाने निदान एक तरी प्रयत्न मात्र केला. मला अजुन आठवतात ते जादुई तीन दिवस. सलग तीन दिवस तीन प्रपोज. (तीन मुली आणी तीन मुले ). प्रत्येकाची नविनच गोष्ट.


आता या र.....ला एक मुलगी आवडली. खुप दिवस आवडली होती. पण आम्हाला त्याने सांगीतले उशीरा. त्याला असे वाटायचे की, ती मुलगी आपल्याकडेच पाहते. मग खुप दिवस तळमळुन काढल्यावर असे ठरले की, ती नाही म्हटली तरी चालेल पण निदान तीला सांगायला तरी पाहीजे. ( आमच्या सर्वांची कॉमन थेयरीच आहे ना.)
..........

.............
....................
.............................
तोपर्यंत खुप वेळ निघुन गेलेला. त्यांची परीक्षा संपलेली आणी ती घरी निघालेली. तीला हाक मारली व र.... तीच्या मागे मागे निघाला. ती थांबायलाच तयार नाही. शेवटी थांबली पण तीच्या तीन मैत्रीणीही थांबल्या. जवळच आमच्या प्युन अप्पा झाडुकाम करत होता. त्याने ही काम थांबवुन दिले व मजा बघत राहीला...

पुढे काय ते वाचा माझ्या कवितेत....

खुप दिवस चालला लपंडाव आपल्या नजरेचा.
नुसतेच पाहत होतो चोरुन एकमेकांना.

खुप विचार करुन शेवटी एक दिवस ठरवला.
पण तोही बिच्चारा तुझा घरी जायचाच निघाला.

परत कोण वाट बघा म्हणून तुला तसेच अडवले.
तीन मैत्रीणी आणि अप्पाही विनाकारण थबकले.

ठरवले मग कशाला चार प्रे़क्षकांना भ्यायचे.
थांबवले आहे तर आता पुर्णच लढायचे.

तीनदा विचारले तरी तिला प्रश्नच कळाला नाही.
"मला गावाला जायचे आहे" शिवाय काहिच बोलली नाही.

पण शेवटी मी गणिमी काव्याने हरलो.
असे विचित्र उत्तर ऐकुन कुठलाच नाही उरलो.

असे परत एकुण तीन प्रयत्न झाले.
प्रश्न तोच पण उत्तर वेगवेगळेच मिळाले.

कधि म्हणाली " मी तुम्हाला एकदा सांगितले ना".
तर कधि म्हणाली "कोन आपण,मी ओळखले नाही".

आता आला दिवस काढतो आहे, प्रयत्नही करतोच आहे.
उत्तरे मिळाली इतकी सारी, अर्थ त्यांचे काढतो आहे.

__ निशिगंध

Saturday, May 30, 2009

जगायचे स्वतःलाच शोधत!!!

तुला शोधता शोधता.....
मी हरवून बसलो होतो स्वतःलाच..
आता तुझे विचारही नाहीत
मनातमी शोधत आहे माझे मलाच...
माझे मलाच...

असे काही तरी लिहायचे आणी समजुत घालायची आपल्या मनाची..
पण प्रयत्न केले नाहीत असे नाही..
खुप प्रयत्न केले तीला सांगण्याचे..
पण हरलोच ना शेवटी, कधी आजुबाजुच्यांचा विचार, तर कधी तिचाच.
तिला काय वाटेल ????
मित्र म्हणायचे अरे सांग तीला मग तिलाच ठरवू दे ना..
त्यांना काय जाते सांगायला.
मी जाईन इथुन २ महिन्यानी पण तीला अजुन २ वर्ष काढायची आहेत हया महाविद्यालयात..

आणि आईचे निराळेच..
फोटो पाहुन म्हणते छान आहे रे!!
पण आपल्यातलीच आहे ना रे!!
आता आपल्यातलीच पाहुन थोडे प्रेम होते..


शेवटी ठरवलेय तीला काहीच सांगायचे नाही..
आणी आपण नुसतेच जगायचे...
आता पर्यंत नाही का
जगलो
आताही पुढे तसेच जगायचे स्वतःलाच शोधत...........

Friday, April 24, 2009

क्षितीज

क्षितीज दुरुन फार छान दिसते,
म्हणुन त्याकडे नुसते पहायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..

सुर्य चंद्र जिथे रोज उगवतात,
तिथे आपणलाही एक दिवस पोहचायचे असते.
म्हणुन त्याला आपण गाठायचे असते.. 

जितके आपण पुढे पळू तितके तेही पळते,
पण आपण मुळीच कंटाळायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..

खुप लोक असेही असतात जे मागे ओढतात,
पण आपण क्षितीजाचेच ध्येय ठेवायचे असते. 
कारण त्याला आपण गाठायचे असते..

एक दिवस कळते आपण बरेच अंतर कापलेले असते,
आणी तरीही क्षितीज तिथुनही तितकेच दुर असते.
पण मागील लोकांना आपण क्षितीजावरच असल्याचे भासते..

तिथेही आपण थांबायचे नसते, पुढे पुढेच जायचे असते,
क्षितीज अजुनही दुर असते, त्याला आपण गाठायचे असते..
त्याला आपण गाठायचे असते..

__ निशिगंध

Thursday, April 23, 2009


जोवर मी लहान होतो. म्हणजे शाळेत जात असे. तोवर मला माझे नाव मुळीच आवडत नसे.
मला माझ्या आई बाबांचा खुपच राग येत असे. मला वाटायचे की, हे काय निशिगंध नाव आहे तेही मुलाचे. नाजुक मुलीचे असल्यासारखे. कधी जर जर आजारी पडलो तरी डॉक्टर साहेब हात लावायच्या अगोदर सुचवायचे की, तुझे नाव फारच नाजुक आहे ते बदल म्हणजे तु आजारी नाही पडणार. आणी मी नाईलाजाने एक जळजळीत नजरेने आई बाबांना खुन्नस द्यायचो. निदान निशिकांत तरी ठेवायचे.
पण आता मला निशिगंध हेच नाव खुप आवडते. कारण फक्त एकच ते म्हणजे निशिगंधाचे फुल..ते मला खुप आवडते. पांढरे शुभ्र नाजुक असे ते फुल पाहील्यावर मला असे उगीच वाटते की मीच आहे. मग मी त्याचे गुगल वर फोटो शोधु लागलो. पण काही केल्या ते सापडेना. खुप शोधाशोध केल्यावर मला असे कळले की त्याचे इंग्रजी नाव ट्युबरोज आहे. मग पुष्कळ सापडली.

Wednesday, April 22, 2009